नाशिक|महाराष्ट्राच्या जडणघडणीत ५० वर्षे योगदान असलेल्या पवार साहेबांबद्दल गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य हा प्रसिद्धीच्या हव्यासापोटी निव्वळ बालिशपणा असून पक्षाने दिलेल्या आमदारकीच्या बदल्यात बेताल निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न आणि समाजासाठी आपण काहीतरी करतो आहे हे दाखवण्याची धडपड म्हणजे पडळकरांचे आजचे बालिश वक्तव्य असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली.
![]() |
| फोटो: मा.खा. समीर भुजबळ |
खासदार शरदचंद्रजी पवार यांनी आजवर कुठल्याही जाती धर्मात तेढ निर्माण न करता बहुजन समाजाच्या बाजूने उभं राहतं न्याय मिळवून देण्यासाठी आपलं उभं आयुष्य वेचलं आहे. आपल्या आयुष्यातील ५० वर्ष देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जडणघडनीत दिलेले आहे. अशा महान व्यक्तीबद्दल स्वतःला कथित समाजाचे नेते म्हणून घेणाऱ्या पडळकर यांचे बेताल वक्तव्य अत्यंत निषेधार्थ आहे.
निवडणूक लाढवतांना भाजपने धनगर आरक्षणाचे खोटे आश्वासन दिले.केंद्रात आणि राज्यात सत्ता असतांना देखील भाजपने धनगर आरक्षणासाठी पाच वर्षे खेळवत केवळ वेळकाढुपणा केला. सरकारचा कालावधी पूर्ण होण्याच्या वेळी धनगर समाजाला गाजर दाखवण्यासाठी पॅकेजची घोषणा केली. हे भाजप सरकारचे धनगर समाजाबाबत असलेलं दुटप्पी धोरण असल्याचे समीर भुजबळ यांनी म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात पवार साहेबांनी बहुजन हिताय अशी अनेक कामे केली.पहिल्यांदा मंडल आयोग लागू करण्याची भूमिका शरदचंद्र पवार साहेबांनी घेतली. त्यामुळे ओबीसी समाजाला न्याय मिळाला. तसेच महिलांना राजकारणात ५० टक्के आरक्षण,डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर असे बहुजन हिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले.त्यामुळे पवार साहेब हे राज्याचेच नव्हे तर देशाचे नेते बनले आहे. ते जनतेचे कैवारी आहे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे म्हणून त्यांना देशाचे जाणते राजे म्हटले जाते.याबाबत पडळकर यांनी माहिती घ्यावी केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आपला बालिशपणा जनतेसमोर दाखवू नये,अशी बोचरी टीका समीर भुजबळ यांनी केली आहे.
