सीरम इन्स्टिट्यूटला भेट देत पंतप्रधानांनी घेतला लसीचा आढावा; २०२१ पर्यंत ३० कोटी डोस उपलब्ध: पूनावाला
पुणे| प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देऊन कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लस विकास, उत्पादन, वितरण, साठवण आणि व्यवस्थापन प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. सायरस पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला, कार्यकारी संचालक नताशा पुनावाला, शास्त्रज्ञ तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी अदर पुनावाला यांनी संस्थेची माहिती दिली. त्यानंतर प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेतील कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस निर्मितीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांना लस देण्याच्या प्रयत्नांची पूर्वतयारी, आव्हाने आणि नियोजन यांची माहिती शास्त्रज्ञांनी दिली.
त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सीरमचे सीईओ आदर पुनावाला यांनी कोविशिल्ड लसी बाबत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली, ते म्हणाले की, क्लिनिकलच्या तिसऱ्या टप्प्यात असलेली ही लस प्रथम भारतात उपलब्ध होईल. साधारण २०२१ पर्यंत ३० ते ४० कोटी डोस तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर आशियातल देशांना तिचे वितरण केले जाईल, तसेच आपत्कालीन उत्पादनासाठी दोन आठोड्यात सरकारकडे परवानगी मागितली जाणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथील झायडस बायोटेक पार्क आणि हैदराबाद येथील भारत बायोटक कंपनीला भेट आढावा घेतला होता.
