नाशिक| कोरोना विषयक जनजागृती करण्यासाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुभाष जांगडा यांनी आज नाशिक ते शिर्डी ९० किलोमीटर अंतर धावत पूर्ण करून कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी साई चरणी साकडे घातले.
सुभाष जांगडा यांनी आज पहाटे ४.३० वाजता नाशिकच्या सातपूर येथील दत्त मंदिरात दर्शन घेऊन धावण्यास सुरुवात केली. दुपारी ३.१२ वाजेच्या सुमारास त्यांनी नाशिक ते शिर्डी अंतर पूर्ण करत शिर्डी येथे साईबाबा यांचे दर्शन घेत कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी साकडे घातले.
यावेळी त्यांच्या समवेत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ सल्लागार जयपाल शर्मा, दादा देशमुख, विशाल पाठक, राजेंद्र सहानी, राजेश इसर्वाल, राजवीर जांगडा, राहुल जांगडा, योगिता निकम राजपूत, रुपाली मुंढे, दिनेश जांगडा, नवीन वर्मा, सचीदानंद शुक्ल आदी सहभागी झाले होते.
गेल्या पाच वर्षापासून सुभाष जांगडा हे नाशिक ते शिर्डी विविध सामाजिक संदेश देण्यासाठी धावत असतात. सुभाष जांगडा यांचे यंदाचे सहावे वर्ष असून त्यांनी आज नाशिक ते शिर्डी हे ९० किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण करत कोरोनाविषयक जनजगृती केली. या अगोदर जांगडा यांनी बेटी बचाव, बेटी पढाओ, स्त्री भृण हत्या, स्वच्छ भारत अभियान, पाणी बचाव मोहीम याबाबत त्यांनी जनजागृती केली आहे. यंदाच्या वर्षी त्यांनी कोरोना विषयक जनजागृती करत कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी साईचरणी साकडे घातले. तसेच कोरोना विषयक दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले.
नाशिकच्या सातपूर येथून त्यांनी आज सकाळी पहाटे ४.३० वाजता दत्त मंदिर येथे दर्शन घेऊन धावायला सुरुवात केली. त्यांनंतर त्यांचे नाशिकरोड, सिन्नर, पांगरी, वावी यासह गावागावात त्यांचे स्वागत करण्यात आले. दुपारी ३.१२ वाजता त्यांनी नाशिक ते शिर्डी अंतर पूर्ण केले. त्यांच्या सोबत असलेले सहकारी देखील त्यांचा सोबत धावले. शिर्डी येथे पोहचल्यानंतर याठिकाणी सुभाष जांगडा यांचा सत्कार करण्यात आला.
सुभाष जांगडा यांचा परिचय
श्री सुभाष जांगड़ा हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असून कोलकत्ता रोडवेजचे ते भागीदार आहे. तसेच नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन कडून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक कार्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो. ते स्वत: देखील सामाजिक बांधीलकीतुन नेहमी समाज उपयोगी वेगळे कार्यक्रम राबवित असतात. ते गोल्फ क्लब नाशिकचे सदस्य आहे.



