मुंबई |शालेय विद्यार्थ्यांच्या फी वाढीच्या मुद्यावरून पालक संघटना आक्रमक झाल्या असून 'ऑल इंडिया पॅरेंटस् असोसिएशन'च्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध पालक संघटनांनी काल शिवसेना भवनावर मोर्चा काढला.
लाॅकडाऊनमुळे अनेकांवर बेकारीचे संकट आले आहे. त्यामुळे शुल्कामध्ये सवलत देण्याची मागणी पालकांनी सरकारकडे केली आहे. शिक्षणमंत्र्यांनी लाॅकडाऊनमध्ये शुल्लक घेऊ नये ,असे आदेश शाळांना दिले तरीही शाळा प्रशासनाकडून विविध शुल्लक वसूल करण्यात येत होते. केवळ शिकवणी शुल्कच घेण्यात यावे या पालकांच्या विनंतीलाही शाळा प्रशासनाकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येत होत्या.
यासंदर्भात पालक संघटनांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शनिवारी सकाळी ११.३० वाजता पालक वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील निवासस्थानी पोहोचले, मात्र त्या तेथे रहात नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पालक संघटनांनी थेट शिवसेना भवनाकडे आपला मोर्चा वळवला.शिवसेना भवनावर स्टेट मायनाॅरिटी कमिशनचे अध्यक्ष जे.एम. अभ्यंकर यांनी याप्रकरणी एक बैठक बसवू असे आश्र्वासन पालक संघटनांच्या शिष्टमंडळाला यावेळी दिले.
ऑल इंडिया पॅरेंटस् असोसिएशन चर्या नेतृत्त्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात मुंबई,पुणे,नाशिक,ठाणे ,नवी मुंबई अशा राज्यातील विविध पालक संघटनांचे प्रमुख आणि त्यांचे कार्यकर्ते सामिल झाले होते.ऑल इंडिया पॅरेंटस् असोसिएशनच्या अध्यक्षा अँड.अनुभा सहाय,राजश्री देशपांडे,मुनाफ मुल्ला,सुनिल चौधरी,केतन कुंभार ,प्रशांत अनूबंध,सुषमा गोराणे यांच्यासह बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळसकर यांच्यासह बालमोहन पालक समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही या मोर्चात सामील झाले होते.

