मुंबई| पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. संजय राठोड यांनी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि राजीनामा सादर केला आहे. मुख्यमंत्री आणि संजय राठोड यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली आणि त्यानंतर संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला.
राजीनामा देतो पण या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर त्याचा स्वीकार करावा अशी काहीशी भूमिका संजय राठोड यांनी घेतली होती. आपले मंत्रिपद टिकावं म्हणून संजय राठोड शेवटपर्यंत प्रयत्नशील होते, संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा दबाव होता. या प्रकरणावरुन शिवसेना, महाविकास आघाडीवर टीकेची झोड उडवली होती.
संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत शनिवारी संजय राऊत यांनी सूचक विधान केलं होतं. संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातला राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजे राजधर्माचे पालन!" पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोडांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधकांचा दबाव वाढत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देखील नाराजीचा सूर आळवला आहे.
मुख्यमंत्र्यांवर स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यांकडून दबाव वाढत असल्याचे दिसले. संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही, असा पावित्रा भाजपाने घेतला होता. तसेच संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा यासाठी शनिवारी राज्यभरात आंदोलन करण्यात आलं होतं.
