शिर्डी| विशेष प्रतिनिधी| राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याच्या बाबतीत जनतेच्या मनात संशय निर्माण होत असेल आणि त्याला आधारित काही क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाले असतील तर लोकांच्या मनात आता फार काळ संभ्रम असता कामा नये, याच सरकारमधील मागे एका मंत्र्याच्या बाबतीत अशीच घटना घडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धाडसाने ठाकरीबाना दाखवून तातडीने राजीनामे घ्यायला हवे अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली.
दरम्यान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शनिवारी शिर्डी येथे साईदरबारी मध्यान्ह आरतीनंतर हजेरी लावत साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी शिर्डी शहर भाजपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजीराजे गोंदकर, मा.उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन,साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, भाजपचे नगरसेवक अशोक गोंदकर आदीसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना दरेकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन जो पक्ष उभा राहिला आणि आज छत्रपतींच्या आशीर्वादानेच राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत आले असतांना आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीबाबत अशाप्रकारचे निर्बंध वातावरण सुरळीत होत असतांंना टाकणे योग्य नाही. एका बाजूला काँग्रेसचा काल मेळावा झाला त्यात हजारोंंच्या संख्येने लोक जमा झाले, राज्यात रेस्टॉरंट बार, पब रात्रभर गर्दित सुरु असून प्रसंगी मोठ मोठे विवाह सोहळे पार पडत असून त्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हजेरी लावत आहे, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याबाबत एका चौकटीत बसवून निर्बंध लादता कामा नाही अशी आमची भूमिका आहे.
साईबाबा संस्थांवर विश्वस्त मंडळ नेमून कारभार सशक्त करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. साईबाबा संस्थानच्या माध्यमातून ग्रामस्थांचे विविध प्रश्नांच्या संदर्भात दुर्लक्ष होत आहे. साईसंस्थानने विश्वस्त मंडळ नेमून हळूहळू दर्शन क्षमता वाढवली पाहिजे असे मत व्यक्त करत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांवर कोणाला ही दडपशाही करता येणार नाही असे ठामपणे सांगत पत्रकारावर गुन्हा दाखल करणे ही बाब अतिशय निंदनीय आहे आणि त्यांच्यावर दबाव तंत्र वापरणे योग्य नसल्याचे आ. दरेकर यांनी बोलून दाखवले. यावेळी भाजयुमोच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
फोटो: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा सत्कार करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजीराजे गोंदकर, मा.विश्वस्त सचिन तांबे आदी

