नाशिक| जीएसटीतील जाचक तरतूदी, नियमांमुळे व्यापाऱ्यांना व्यापार करणे अवघड झाले आहेे. या जाचक तरतुदींविरोधात कॅटने (सीएआयटी) २६ फेब्रुवारी रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे, अशी माहिती कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स राज्य समितीचे उपाध्यक्ष मेहुल थोरात यांनी दिली.
थोरात म्हणाले की, जीएसटीतील नियमांच्या सारख्या बदलांमुळे व्यापाऱ्यांना व्यापार करणे अवघड झाले आहे. जाचक नियम व तरतुदीमुळे इन्स्पेक्टरराज आणि भ्रष्टाचार वाढीस लागेल. त्यामुळे अधिकारी केव्हाही नोंदणी रद्द करू शकता, अगदी शुल्लक चुकीमुळे केव्हाही जीएसटी नोंदणी क्रमांक रद्द करण्याची टांगती तलवार कायम लटकलेली असते. त्यातच दंड आणि शिक्षेची तरतूद ही आहे. अशा जाचक तरतुदींमुळे व्यापारी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही. व्यापाऱ्यांना व्यापार करणे कठीण होईल असे थोरात यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे व्यापारी आणि विविध संघटनांमध्ये जनजागृती होणे गरजेचे असून सर्वांनी एकत्र येऊन जाचक नियमांना विरोध करून आपली शक्ती दाखवण्याचा निर्धार (सीएआयटी)कॅटनेे केला आहे. त्यासाठी बंद यशस्वी करण्यासाठी सर्व व्यापारी संघटनांनी कंबर कसली असून इतर संघटनांनी ही या बंद मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ही त्यांनी केले.
नाशिक सराफ असोसिएशनचा बंदला पाठिबा
नाशिक सराफ असोसिएशनने ही कॅटच्या २६ फेब्रुवारीच्या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. जीएसटीतील जाचक तरतूदी विरोधात काळया फिती लावून असोसिएशनतर्फे विरोध दर्शवला जाणार आहे, असे नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीष नवसे आणि कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स राज्य समितीचे उपाध्यक्ष तथा सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष मेहुल थोरात यांनी सांगितले आहे.
