नाशिक| कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनाथ मुलांना सांभाळनाऱ्या आधारतीर्थ संस्थेला अन्नधान्याची व किराणा मालाची कमतरता भासत असल्याने राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नधान्य व किराणा मालाचे वाटप करण्यात आले. याबाबत आज मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉ.शेफाली भुजबळ यांनी त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ संस्थेला भेट देऊन सदर वस्तूंचे वाटप केले.
कोरोनाच्या कालावधीत मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक यांच्या वतीने समाजिक जबाबदारीतून अनेकांना मदतीचा हात दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंजाब, हरियाना, कर्नाटक, राजस्थान इत्यादी ठिकाणी परराज्यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचविण्याची व्यवस्था मेट मार्फत करण्यात आली होती. कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या जिल्ह्यातील पोलिसांना मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या वसतीगृहात विलीगीकरण कक्षाची निर्मिती करून त्यांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नाशिक शहरातील विभागीय क्रीडा संकुलातील मीनाताई ठाकरे स्टेडीयम येथे २०० ऑक्सिजन व १०० सीसीसी असे एकूण ३०० बेड्सचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले असून रुग्णसेवा करण्यात येत आहे.
सामाजिक जबाबदारीतून मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून कोरोनाच्या कालावधीत सामाजिक कार्य अविरतपणे सुरु आहे. त्याचमाध्यमातून त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ येथील अनाथ मुलांना मदतीचा हात दिला आहे. आज संस्थेच्या संचालिका डॉ.शेफाली भुजबळ यांच्या हस्ते या संस्थेला दोन महिने पुरेल इतके अन्नधान्य व किराणा मालाच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे येथील अनाथ मुलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून मिळालेल्या मदतीबद्दल आधारतीर्थ संस्थेचे संचालक त्र्यंबकराव गायकवाड यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉ. शेफाली भुजबळ व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, कैलास मुदलियार, समता परिषदेचे शहर उपाध्यक्ष हर्षल खैरनार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
