नाशिक| महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा बृहत आराखडा अद्यायावत करण्याची प्रक्रिया सुरु आहे. विद्यापीठाची सहावी यथार्थदर्शी योजना (Perspective Plan) अद्यायावत करण्यासाठी आरोग्य शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती, नागरिकांकडून अभिप्राय किंवा सूचना मागविण्यात येत आहे. विद्यापीठाचा बृहत आराखडा सर्वसमावेशक असावा याकरीता विद्यापीठाचे मा. प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, कुलसचिवडॉ. कालिदास चव्हाण, विद्यापीठाचे विविध प्राधिकरणाचे सदस्य प्रयत्नशिल आहेत.
राज्यात आरोग्य विज्ञान शिक्षण सुविधांचे समन्याय वाटप व्हावे या दृष्टीकोनातून उच्चतर शिक्षणाच्या संस्थांची स्थाने निश्चित करण्यासाठी शैक्षणिक विकासाची यथार्थदर्शी विद्यापीठ योजना (Perspective Plan) तयार करण्यात येतो. शासनाने निर्देशित केल्यानुसार राज्यातील दुर्गम व आदिवासी भागात आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा मिळण्यासाठी महाविद्यालय सुरु करण्यासाठी विशेष प्राधान्य देण्यात येते. विद्यापीठाचा सन 2022 ते 2027 या कालावधी करीता बृहत आराखडा करण्यात येणार आहे. या संदर्भात आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींनी विद्यापीठास सूचना, मार्गदर्शन करावे. सदर मार्गदर्शन, सूचना विद्यापीठास टपाल किंवा ई-मेल व्दारा विद्यापीठाकडे सादर पाठविण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.
विद्यापीठ अधिनियमानुसार पाच वर्षांकरीता अद्यायावत बृहत आराखडा तयार करण्यात येतो. यामध्ये राज्यातील विविध विद्याशाखांचे महाविद्यालये, स्थानिक लोकसंख्या, जिल्हा किंवा तालुक्यातील महाविद्यालयांची संख्या, महाविद्यालयातील अंतर, महापालिकेस संलग्नित महाविद्यालय आदी बाबी महत्वपूर्ण असतात. याकरीता विद्यमान सन्माननीय मा. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद सदस्य, विविध संस्थांचे संस्थाचालक, विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयांचे अधिष्ठाता, प्राचार्य, विद्यापीठ प्राधिकरण सदस्य, समाजसेवक, जिल्हा शल्य चिकीत्सक यांची मते विचारात घेण्यात येतात.
विद्यापीठाची स्थापना दि. 03 जून 1998 मध्ये झाली. आजपावेतो पाच बृहत आराखडा तयार करण्यात आले होते. या अनुषंगाने विद्यापीठाचा सन 2022 ते 2027 कालावधीसाठी बृहत आराखडा तयार करण्याचे कामकाज सुरु असल्याचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले.
विद्यापीठाचेwww.muhs.ac.in संकेतस्थळावर विद्यापीठ बृहत आराखडा संदर्भात माहिती प्रसिध्द करण्यात आली असल्याचे विद्यापीठाच्या नियोजन विभागाचे प्र.संचालक डॉ. राजीव आहेर यांनी सांगितले. विद्यापीठाची सहावी यथार्थदर्शी योजना दर्जेदार व्हावी याकरीता नागरिकांनी व संबंधितांनी आपले अभिप्राय किंवा सुचना असल्यास अधिकृत ई-मेलवरुन विद्यापीठास planning@muhs.ac.in ईमेलवर पत्त्यावर किंवा टपालाव्दारे दि. 10 जून 2021 पर्यंत पाठवावेत. विहित वेळेत प्राप्त अभिप्रायांचा विद्यापीठाकडून सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल. तरी संबंधितांनी व नागरिकांनी आपले अभिप्राय व सूचना विद्यापीठाकडे सादर कराव्यात.
