कोकण नुकसानग्रस्त उद्योजकांशी चर्चा: बँकांमार्फत कमी व्याजदराने कर्ज, तात्काळ विमा रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील: संतोष मंडलेचा
नाशिक| महाराष्ट्राच्या विविध भागात पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकणात अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. व्यापारी उद्योजक आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा व व्यवस्थापन समिती सदस्य तसेच राज्यातील प्रमुख विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची शुक्रवार ऑनलाईन बैठक झाली.
याप्रसंगी व्यापारी उद्योजकांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला व कोकण भागाचा दौरा करण्याचे निश्चित करण्यात आले. बैठकीत केंद्र सरकार व राज्य सरकारांकडून नुकसानग्रस्त व्यापारी उद्योजकांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणे, बँकाच्या माध्यमातून कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध व्हावे, औद्योगिक वसाहतीतील वीज व पाणी पुरवठा सुरु करणे, विमा कंपन्यांकडून लवकरात लवकर पेमेंट मिळावे, जीएसटी, आयटी रिटर्न भरण्यास मुदतवाढ मिळणे, क्रेडिट गँरंटी योजनेचा लाभ मिळवून देणे, विमा कंपन्या जर क्लेम देत नसतील तर विमा नियामक आणि विकास प्राधिकरनाकडून क्लेम मिळवून देणे.
तसेच व्यापारी उद्योजकांना तात्काळ आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी व यासह व्यापारी उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे समन्वय सुरु आहे. व्यापारी उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्र चेंबरतर्फे प्रयत्न सुरु असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांनी दिली. महाराष्ट्र चेंबर वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. ललित गांधी यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले कि, कोकणात अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. व्यापारी उद्योजक आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याबाबत महाराष्ट्र चेंबरतर्फे मदतीसाठी प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, स्थानिक लोकप्रतिनिधी यांना व्यापारी उद्योगांचे झालेले नुकसान व मदतीचे आवश्यकता याबाबत निवेदने दिली आहेत.राज्य व केंद्र सरकारकडे समन्वय सुरु असल्याचे सांगितले.
बैठकीत महाराष्ट्र चेंबरच्या विश्वस्त मंडळाचे चेअरमन श्री. आशिष पेडणेकर, उपाध्यक्षा सौ. शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष श्री. उमेश दाशरथी, अमरावती चेंबरचे अध्यक्ष श्री. विनोद कलंत्री, सोलापूर चेंबरचे अध्यक्ष श्री. राजू राठी, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह श्री. नितीन वाळके, श्री. चंद्रशेखर पुनाळेकर, श्री. बाबा मोंढकर, श्री. विजय किनवडेकर, नितीन थायशेटे, श्री. प्रशांत पटवर्धन, श्री. अशोक सारंग, श्री. सुदान केसरकर यांच्यासह विविध व्यापारी उद्योजकांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपआपली मते व अडचणी मांडल्या. स्वागत महाराष्ट्र चेंबरचे प्रभारी सरकार्यवाह श्री. सागर नागरे यांनी केले तर आभारप्रदर्शन उपाध्यक्षा सौ. शुभांगी तिरोडकर यांनी मानले. बैठकीस कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष श्री. संजय शेटे, श्री. राजन नाईक, श्री. गणपत बेळणेकर, श्री. अकिब कुडाळकर, श्री. सचिन पाटणे, श्री. राजेंद्र शेट, चेंबरच्या सचिव विनी दत्ता आदिंसह व्यापारी उद्योजक उपस्थित होते.

