नाशिक| 'एचयुआयडी' सारख्या अत्यंत किष्ट, किचकट प्रणालीला विरोध करण्यासाठी येत्या २३ ॲागस्ट रोजी राज्य व केंद्रीय सराफ संघटनांनी पुकारलेल्या एकदिवसीय लाक्षणीक बंदला दि नासिक सराफ असोसिएशनने पाठिंबा दिला आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी काल दि. २० ॲागस्ट रोजी नासिक सराफ असोसिएशन हॅाल येथे महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये नासिक शहरासह जिल्ह्यातील असोसिएशनशी चर्चा करून २३ ॲागस्ट रोजी नासिक शहरासह जिल्ह्यातील सर्व असोसिएशन एचयुआयडीला विरोध करण्यासाठी कडकडीत बंद पाळणार असल्याच्या निर्णयावर एकमत झाले. दि. २३ ॲागस्टला दिवसभर नाशिक शहरासह जिल्ह्यातील सर्व सराफी व्यवसाय एकदिवसीय बंद पाळणार आहेत. क्वालिटी कन्ट्रोलसाठी हॅालमार्क कायदा गरजेचा असून या कायद्याचे सर्व सराफ व्यावसायीकांनी स्वागत केले आहे. मात्र केंद्र सरकार एचयुआयडी सारखी क्लिष्ट प्रणाली आणुन सराफी व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर गदा आणू पहात आहे.
या कायद्याने व्यवसाय करणे कठीण होऊन बसले आहे. हा कायदा रद्द करण्याची एकमुखी मागणी देशभरातून केली जात असून त्या पार्श्वभुमीवर २३ ॲागस्टला संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील सराफ व्यावसायीक बंद पाळणार आहेत.
२३ ॲागस्ट रोजी याप्रश्नी व्यापाऱ्यांसाठी चर्चासत्र आयोजित केले जाणार असून याबाबत लवकरच कळविण्यात येईल असे दि नासिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे, सेक्रेटरीकिशोर वडनेरे, उपाध्यक्ष मेहुल थोरात व प्रमोद चोकसी, खजिनदार योगेश दंडगव्हाळ यांनी सांगितले आहे.
