मोखाडा| तालुक्यातील साखरी येथील ललिता बाबू वाघ (४५) या कातकरी महिलेचं पाच महिन्याचे बाळ असताना तिचा मृत्यू झाला, यानंतर गेल्या एका वर्षाभरापासून तिची मुलगी कल्पना सुनिल सवरा ही त्या बाळाचा सांभाळ करत होती परंतु दुर्दैवाने प्रसूती दरम्यान तिचा देखील महिन्याभरापूर्वी मृत्यू झाला व सुदैवाने तिचे बाळ वाचले. परंतु या दोन्ही बालकांना नियतीच्या खेळाने त्यांच्या आईपासून दुर केल्याने त्यांच पालनपोषण करणं अवघड झालंय. त्याच्यासाठी शिवसेनेने मदतीचा हात पुढे केला.
गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचा मामा मंगेश बाबू वाघ हा कार्तिक (सहा महिने) गुरुनाथ (दीड वर्ष) यांचा सांभाळ करत होता.परंतु त्याला देखील सात महिन्याची मुलगी आहे, त्यातच त्यांची परिस्थिती देखील हलाखीची असल्याने त्याला देखील अधिक दिवस या मुलांचे सांभाळ करणे शक्य होत नव्हते, यामुळे गेल्या काही दिवस कार्तिकचे वडील या दोन्ही मुलांचा सांभाळ करत होते.या नंतर सुनिल सवरा याचा भाऊ कार्तिक सवरा हा गेल्या आठवड्या भरापासून या मुलांचा सांभाळ करतोय.
परंतु या सर्वांचीच परिस्थिती हलाखीची असल्याने या लहानग्याचा पालन पोषण कसं करायचं असा प्रश्न त्यांच्या समोर येऊन ठाकला असताना मोखाडा शिवसेनेने सामजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे. पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आमदार रविंद्र फाटक यांच्या वाढदिवसानिमित्त व स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत या कुटूंबियांना दोन महिन्याचे किराणा साहित्य देण्यात आले. तसेच तालुका प्रमुख अमोल पाटील यांनी रोख स्वरूपात मदत केली तसेच या चिमुकल्यांचा भविष्यात कोणतेही मदत लागल्यास शिवसेना पक्ष कटिबद्ध राहील असे प्रकाश निकम यांनी सांगितले. यावेळी मोखाडा पंचायत समितीच्या सभापती सारिका निकम, तालुका प्रमुख अमोल पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम,स्थानिक कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थिती होते.
