नाशिकरोड| प्रतिनिधी| भारत सरकार मुद्रणालय, गांधीनगरच्या मागील परिसर रामदास स्वामी नगर, लेन क्र. २ येथे तातडीने कोविड-१९ लसीकरण केंद्र सुरू करावे अशी आग्रही मागणी प्रभाग १६च्या नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे यांनी केली आहे. वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय (आरोग्य विभाग) महापालिका, नाशिक यांना प्रभाग १६च्या नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे यांच्यावतीने निवेदन देण्यात आले.
प्रभाग १६ मधील गांधीनगर प्रेसच्या मागील बाजूस रामदास स्वामी नगर लेन क्र. १,२,३ असा मोठा रहिवासी परिसर आहे. याभागात अनेक सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध महिला, दिव्यांग, व्याधीग्रस्त राहतात. उपनगर परिसरात महापालिका अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, या एकाच ठिकाणी कोविड-१९ लसीकरण केंद्र सुरू आहे. परिणामी रामदास स्वामी नगर व आसपासच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, व्याधिग्रतांना तेथे जाऊन लस घेणे, हे तुलनेने त्रासदायक जाणवते. हा परिसर मोठा असल्याने उपनगर महापालिका केंद्र जाण्यास लांब पडते.
रामदास स्वामी नगर लेन क्र. २ येथे राजमाता जिजाऊ वाचनालय असून येथे मोठी जागा उपलब्ध आहे. तसेच हे वाचनालय प्रशस्त आहे. वाचनालयात लसीकरण केंद्र सुरू झाल्यास संपूर्ण परिसरातील ज्येष्ठ नागरिक, वयोवृध्द महिला, ४५ वर्षावरील व्याधिग्रतांना, दिव्यांगाना सोयीस्कर होईल. ही संपूर्ण परिसराचीच मागणी आहे. तातडीने यावर विचार होऊन जलदगतीने पावले उचलावी, अशी मागणी नगरसेविका सौ सुषमा रवी पगारे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
