नाशिक| प्रतिनिधी| सोशल डिस्टींक्शनचे नियम पाळत, फेस मास्क, हातमोजे व सॅनिटायझरचा वापर करत सलग ११ व्या वर्षीचा देव द्या, देवपण घ्या उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
गणेश विसर्जनाच्या निमित्ताने चोपडा लाँन्सजवळील गोदापार्क येथे सकाळी ८ वाजेपासून “देव द्या देवपण घ्या” या उपक्रमाचे कार्यकर्ते मूर्ती स्विकारण्यासाठी उपस्थित होते. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्ती संकलित करणाऱ्या कार्यकर्त्यांनी फेस मास्क व हातमोजे घातले होते. घरगुती गणेशोत्सवातील गणेश मूर्ती दान करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या हातावर सॅनिटायझर देण्यात येत होते. तसेच गणपती मूर्तीवर देखील सॅनिटायझरचा फवरला केल्यानंतरच ती स्वीकारण्यात येत होती. मराठी अभिनेता अभिजित खांडकेकर यांनी देखील मूर्ती दान करत देव द्या, देवपण घ्या उपक्रमात सहभाग घेतला.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधने व निर्माल्यामुळे गोदावरीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. त्यामुळे विद्यार्थी कृती समिती तर्फे गेल्या ११ वर्षांपासून “देव द्या, देवपण घ्या” हा उपक्रम राबविण्यात येतो. गणेशोत्सवातील १० दिवस विद्यार्थी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी जनजागृती करणारे पत्रके घराघरात वाटली होती. तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून देखील प्रभावी प्रचार तसेच आवाहन करण्यात आले होते. नाशिकच्या गोदाप्रेमी भाविकांनी या आवाहनाला भरभरून पाठिंबा दिला. दिड, पाच व सात दिवसांच्या घरगुती गणेशोत्सवातील मूर्ती देखील स्वीकारण्यात आल्या होत्या.
विसर्जनाच्या दिवशी सकाळी ८ वाजेपासूनच विद्यार्थी कृती समितीचे कार्यकर्ते चोपडा लाँन्सजवळील गोदापार्कच्या प्रवेशद्वाराजवळ तयार करण्यात आलेल्या मूर्ती संकलन केंद्रावर गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन करीत होते. पोपटी रंगाचे शर्ट, फेस शिल्ड, फेस मास्क व हातमोजे घातलेले हे कार्यकर्ते नाशिककरांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी लहानग्यांपासून ते वयोवृद्ध नागरिक मोठया संख्येने गणेश मूर्ती दान करत होते. या मुर्ती अत्यंत भावपूर्ण वातावरणात महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येत होत्या. या उपक्रमास लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश पगार, विशाल गांगुर्डे, वैष्णवी जोशी, राहुल मकवाना, मोनाली गवे, सागर बाविस्कर, प्रतीक्षा वखरे, जयंत सोनवणे, स्नेहा आहेर, संकेत निमसे, जयश्री नंदवानी, तुषार गायकवाड, भाग्यश्री जाधव, रोहित कळमकर, विशाखा वाखारे, कोमल कुरकुरे, भावेश पवार, दुर्गा गुप्ता, अतुल वारुंगसे, सोनू जाधव, ललित पिंगळे, अविनाश बरबडे, अमोल पाटील, मयूर पवार, वैभव बारहाते, सागर दरेकर, मंगेश जाधव, सिद्धार्थ दराडे, अमोल भांड, अपूर्व सोनवणे, विकास ओढेकर, महेश मंडाले, गणेश शेळके, अक्षय अरिंगळे, कुणाल सानप, हरी चौधरी, सोमनाथ दळवी, हरिश्चंद्र चव्हाण, कृष्णा जोपुळे, मनोज गावित, रमेश बहिरम, दिनेश ठाकरे, भास्कर ठाकरे, निलेश मोरे, पुरुषोत्तम नागरे, आकाश रायते, सोनू आहेर, रितेश लोखंडे, संचित शेळके, प्रकाश चितोडकर, सुशांत पाटील, सागर बच्छाव, तुषार इप्पर, प्रणव पगारे आदींनी परिश्रम घेतले.
(फोटो: सलग ११ व्या वर्षीच्या देव द्या, देवपण घ्या उपक्रमांर्तगत गणेश मूर्ती स्वीकारताना विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार व कार्यकर्ते दिसत आहेत.)
देव द्या देवपण घ्या यशस्वी ११ वर्ष पूर्ण
देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमास सलग ११ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अभिनेता अभिजित खांडकेकर यांच्या हस्ते केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला. देव द्या, देवपण घ्या हा कौतुकास्पद उपक्रम असल्याने माझ्या घरची गणेश मूर्ती देखील मी आकाश पगार यांच्याकडे सुपूर्द केल्याचे खांडकेकर यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

