नाशिक| नाशिक शहरातील सातपूर व अंबड एमआयडीसी तसेच सिन्नर येथील माळेगाव एमआयडीसी येथे ट्रक टर्मिनल नसल्याने वाहतुकीच्या समस्या निर्माण होत आहे. तसेच दिवसेंदिवस वाहतुकीच्या नियमावलीत बदल होत असून ट्रक टर्मिनल ची नितांत आवश्यकता आहे. या अगोदर देखील संघटनेच्या वतीने वारंवार मागणी करण्यात आली असून अद्याप हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे लवकरात लवकर अंबड आणि सिन्नर माळेगाव येथील राखीव भूखंडावर ट्रक टर्मिनल विकसित करण्यात यावे अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेली आहे.
याबाबत संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड व वरिष्ठ उपाध्यक्ष पी.एम.सैनी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ व एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की,नाशिक महानगरपालिका हद्दीमधील सातपूर, अंबड आणि सिन्नर (माळेगाव) येथे एमआयडीसी असून याठिकाणी मोठ्याप्रमाणात औद्योगिक कारखाने आहेत. त्यामुळे या परिसरात मोठयाप्रमाणात अवजड वाहतूक होते. नाशिक शहर भारताचे स्मार्ट सिटीचे यादीत समाविष्ट झालेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या शहरामध्ये मोठी गुंतवणूक होऊन शहराचे औद्योगिकीकरणात मोठी भर पडणार आहे. शहरात असलेल्या मोठया औद्योगिक वसाहतीमुळे तसेच शेतमालाचे वाहतुकीसाठी भारतातील अनेक राज्यांमधुन माल वाहतुकीसाठी अवजड वाहने (ट्रक व ट्रेलर) येत असतात. सदर ट्रक,ट्रेलर हे रस्त्यात उभे राहतात त्यामुळे वाहतुकीला अडथळा येतो आणि यामुळे अनेक अपघात झालेले आहे यात अनेक कामगारांना आपले जीव गमवावे लागले आहे.ही बाब लक्षात घेऊन आपण आरक्षित ट्रक टर्मिनल विकसित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
अंबड व सिन्नर येथील औद्योगिक वसाहतीत मंजुर विकास आराखडयात ट्रक टर्मिनलसाठी ५ एकर जागा आरक्षित करण्यात आलेली आहे.या जागा कायदेशीर आरक्षित असून सर्व सोयी सुविधांसाठी पुरेशी आहे. सदर ठिकाणी ट्रक टर्मिनल विकसित होणेबाबत संघटनेच्यावतीने यापुर्वी वारंवारपाठपुरावा करण्यात आलेला आहे. मात्र अद्यापपर्यंत याठिकाणी ट्रकटर्मिनल उभारण्यासाठी कोणतेही सकारात्मक निर्णय झालेले नाही. यापुर्वी देखील संस्थेच्या वतीने शासन दरबारी पाठपुरावा करण्यात आला होता. परंतु दुर्दैवाने सदरबाबत आजपावेतो कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही. सदर विषय गेले अनेक वर्ष प्रलबिंत आहे. ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित जागेत ट्रक टर्मिनलच उभे रहावे ही संघटनेची व उद्योजकांची मागणी असून त्याचा लवकर निर्णय घेण्यात यावा असे म्हटले आहे.
शहराचे वाढते औद्योगिक वितरणामुळे व एकुणच चौफेर विकसित होणाऱ्या शहरात विशेषत: औद्योगिक परीसरात ट्रक टर्मिनल असणे हे अत्यंत आवश्यक बाब आहे. ट्रकवरील चालक व क्लीनर हे बाहेर राज्यातील व अत्यंत गरीब परीस्थितीतील असुन ट्रक टर्मिनलच्या ठिकाणी त्यांचेराहण्याची, उपहारगृह, स्वच्छागृह, विश्रांतीगृह, वाहन दुरूस्तीसाठी गँरेज, डीझेल पंप,वजन काटा, स्पेअर पार्ट दुकान, गोडावून, सर्विस स्टेशन, प्रशिक्षण हॉल, प्रथमोपचारसाठी व्यवस्था असावी. अशी आमची अनेक वर्षापासुनची मागणी प्रलबिंत आहे. नाशिक शहरातील आरक्षित ट्रक टर्मिनल विकसित झाल्यास शहरावरील वाहतुकीचा ताण तसेच वाहतुककोंडी सोडविण्यासाठी उपयुक्त ठरेल असे त्यांनी शेवटी म्हटले आहे.
