नाशिक| नाशकात गेल्या दोन दिवसांपासून गोदावरी आणि दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने नदी,नाले तुडूंब भरून वाहत आहे, तसेच गंगापूर धरण भरल्याने गोदावरी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. नाशिक शहरातील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी वाढलं आहे. रामसेतू ब्रिजपर्यंत पाणी वाढलं आहे. त्यामुळे सराफ बाजारही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यावसायिकांची एकच धावपळ उडाली आहे. दुकानं हटवण्याची धावपळ सुरू आहे. तर प्रशासनाकडून नागरिकांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे.
पावसाचा जोर वाढत असल्यामुळे नाशिक शहराला महापुराचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसाने नाशिकच्या ग्रामीण भागात अक्षरशः हैदोस घातला असून सलग होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मनमाड, नांदगाव, मालेगाव, चांदवड, सटाणा, देवळा भागातील सर्वच नदी, नाले, ओढ्यांना पूर आला आहे. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.गंगापूर धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता गंगापूर धरणातून 5 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर, नाशिकच्या गोदा घाट परिसरात पुन्हा पाणी वाढलं आहे. रामकुंड परिसरात असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेला पाणी लागलं असून रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं पाण्यात गेली आहेत. संध्याकाळ नंतर आणखी पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता असल्याने, गोदा घाट परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गंगापूर धरणातून दुपारनंतर 15000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक पाण्याचा विसर्ग आज होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे गोदा घाटच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जनावरं मोकळी सोडा, बांधून ठेवू नका, अशी सूचना प्रशासनाने दिली आहे. त्र्यंबकेश्वर भागात मुसळधार पावसामुळे धोका वाढला आहे.
Photo Credit: Mehul Thorat

