संपूर्ण जगात भारत देशालाच गौरवशाली, शौर्यशाली परंपरा लाभलेली आहे. भारतालाच इतिहासाचे अमूल्य कोंदण लाभलेले आहे. पुरातन काळातील ऋषी-मुनी, संत, महंत, सद्गुरू, परात्पर गुरू यांनीच भारताला घडवले आहे. जिथे प्रभू श्रीरामचे अस्तित्व आहे, तिथेच रावण सारखी प्रवृत्ती असते. कालांतराने या प्रवृत्तीचा नाश होतोच. तीच रावणाची प्रतिकृती (प्रवृत्ती) आज तालिबानने जगाला दाखवून दिली आहे. त्यांचे रोज नवनवीन (एका रात्रीतून) निघणारे 'फतवे' पाहिल्यानंतर जगात 'लोकशाही' हा शब्द तरी अस्तित्वात आहे का ?? असा प्रश्न कोणालाही पडल्यावाचून राहणार नाही. तालिबान म्हणजे 'कट्टर' एका पंथ (धर्म) यांना मानणारा विद्यार्थी, असा साधा सरळ सोपा अर्थ आहे. परंतु तालिबानने 'विद्यार्थी' या शब्दाचा नायनाट करून टाकला आहे. तालिबानचे जे म्होरके आहेत, त्यांनी सरळ महिलांना कुठलेच अधिकार नसून त्यांचे काम केवळ मुले जन्माला घालणे एवढेच आहे, असा अजब फतवा काढून महिलांचेच 'तुष्टीकरण' केले. पण या तालिबानी म्होरक्याना हे देखील कळले नाही, की त्यांनी ही एका महिलेच्या पोटीच जन्म घेतला आहे. अत्यंत क्रूर मानसिकतेचे दर्शन तालिबानी प्रवृत्तीने संपूर्ण जगाला घडवले, असे म्हटले तरी वावगं नाही. ज्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण अफगाणिस्तान बंदुकीच्या जोरावर कह्यात घेतला, ते पाहून जागतिक महासत्ता म्हणून 'टेंभा' मिरवणाऱ्या देशांना हे पचनी कसे पडले ?? वास्तविक या देशांना कुठलाच इतिहास नाही. मोठमोठ्या परिषदा भरवायच्या, आणि त्यात केवळ 'पोकळ' भाषणबाजी करायची, असा यांचा ठरलेला कार्यक्रम असतो. ९/११ नंतर जागतिक महासत्तेने आतंकवाद यांचा नायनाट केला. असे आपण सर्वांनी पाहिले (की केवळ दाखवले) आता ते कुठे गेले ? त्यांनी इतक्या सहजासहजी अफगाणिस्तानातून सैन्य माघारी का नेले ? बरं नेले तर नेलं, पण जातांना करोडो रुपयांची शस्त्र-सामुग्री तिथेच का ठेवली ? वीस वर्षे ज्या ठिकाणी सैन्य ठेवून त्यावर अफाट खर्च केला, त्याची आत्ताच का उपरती झाली. वास्तविक या टेम्भा मिरवणाऱ्या देशाचे वागणे म्हणजे 'डबल स्टॅंडर्ड' दोहरा मापदंड किंवा डबल ढोलकी स्वरूपाची आहे. त्यांनी आतंकवादाचे समूळ उच्चाटन केलेच नाही, उलट त्याला खतपाणी घातले, असे म्हणण्यास वाव आहे. जागतिक महासत्तेने आतंकवादी यांना जेरबंद करण्यासाठी लाखो रुपयांचे बक्षिसे जाहीर केली, आता तेच आतंकवादी त्यांच्या समोर बसून वाटाघाटी करतील. असे 'अलौकिक' दृश्य लवकरच पाहायला मिळू शकते. जागतिक महासत्तेने 'आतंकवाद' नष्ट करण्याचा केवळ आव आणून त्यापाठीमागून केवळ आपला बदला घेतला. त्यांना जगाशी काहीही देणेघेणे नाही. संपूर्ण आशिया खंडात केवळ भारतच आतंकवाद समूळ उच्चाटन करू शकतो, याची जाणीव आता या जागतिक महासत्तांना झाली आहे. आतंकवाद विरुद्ध युद्ध सुरू तर केले, पण लगेच पराभूत मानसिकतेत का गेले ?
केवळ भारतावर आशा
भारत हा अनेक वर्षांपासून परकीय आक्रमणे झेलत आला आहे. त्यातून तो पूर्णपणे निखरला आहे. उभारणी घेतली आहे, असे इतिहासात नोंद आहे. हे केवळ आणि केवळ भारताच्या नशिबी आले आहे. इतर देशांची लायकी नाही. राष्ट्रघातकी विचार पेरणारे या भारतातही भरपूर प्रमाणात सापडतील. अफगाणिस्तान वर तालिबानने कब्जा मिळवला, हे पाहून किंवा एकूण अनेकांच्या मनात उकळ्या फुटल्या असतील. पण सकारात्मक वेळच त्यांना उत्तर देऊन गप्प बसवतो. जेव्हा संपूर्ण भारतावर गुलामगिरीचे कवच निर्माण झाले होते, तेव्हा अशा नैराश्य वातावरणात 'हिंदवी स्वराज्याचे' रणशिंग फुंकले गेले होते. याच हिंदवी स्वराज्यात 'अटकेपार झेंडे' लागले होते. या 'जरी पटक्याची' दहशत संपूर्ण जगाने अनुभवली होती. हाच 'जरी पटका' एके काळी अफगाणिस्तानच्या मुळावर उठला होता. त्याच्या चिवट झुंजीचे दुष्परिणाम अफगाण्यांनी भोगले आहे. 'जरी पटक्याचे' नाव उच्चारले तरी एके काळी त्यांना कापरे भरत होते. आता ही तीच वेळ येऊन ठेपली आहे. विजयाचा वारसा केवळ भारताकडे आहे. त्या विजयाचे तंत्र भारतच्या मातीत उपजतच आहे. सर्व जगाला हतबलतेने ग्रासले आहे. अशा नैराश्यपूर्ण वातावरणात केवळ भारत (हिंदुस्थान)च आशेचा किरण आहे. परिणामी संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या भूमिकेकडे लागले आहे.
साभार: युगांतर युग/लेख