नाशिक| लसीकरणावर भर दिल्याने कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून सराफबाजार ही आता पूर्वपदावर येत आहे. आगामी दिवाळी, पडवा आणि लग्नसराईच्या दृष्टीने सोन्याची चमक आणखी वाढण्याची शक्यता असून भावात साधारण दोन ते अडीच हजारांनी वाढ होण्याची शक्यता सराफी व्यवसायातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या सोने भाव २४ कॅरेटला ४९८०० इतका आहे. त्यामुळे सोने खरेदीला ही चांगली संधी मानली जात आहे.
आरोग्य यंत्रणेने लसीकरणावर भर दिल्याने कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून निर्बंध हळूहळू शिथिल होत आहे. त्यामुळे सणासुदीच्या वातावरणामुळे बाजारपेठा गजबजू लागल्या आहे. गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे आर्थिक उलाढाल ठप्प होती. ती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सराफ बाजारात आगामी दिवाळी आणि लग्नसराईच्या खरेदीसाठी ग्राहकांची पावले सरफाबाजारकडे वळत असून गेल्या वर्षी मार्च २०२० ला सोन्याने ५६,२०० रुपये १ तोळा इतका उच्चांकी भाव गाठला होता. लोकांना खरेदीची इच्छा असली तरी निर्बंधांमुळे शक्य होत नव्हते. त्यामुळे व्यवसायावर त्याचा परिणाम दिसून आला.
गत वर्षीच्या तुलनेत ५ ते ७ सात हजारापर्यंत सोने भाव उतरला आहे. आज(दि. २६) रोजी सोने २४ कॅरेटला जीएसटीसह ४९,८००/ रुपये इतका भाव आहे. मागील वर्षी पाडव्याला ५१,५००/ तर चांदी किलोला ६४५०० भाव होता. आता दिवाळी, पाडवा आणि त्यानंतरची लग्नसराई यामुळे सोने दरात दोन ते अडीच हजाराची वाढ होण्याची शक्यता आहे, असे असले तरी सोने खरेदीला ग्राहकांची पसंती कायम आहे.
यंदा सोने खरेदीसाठी ग्राहकांना चांगली संधी: गिरीश नवसे
गेल्या १५ ते २० दिवसात दोन ते अडीच हजार रुपयांनी दर वाढला आहे, असे असले तरी मागील वर्षीच्या तुलनेत ग्राहकांना सोने खरेदीची ही चांगली संधी आहे. सणासुदीनंतर येणाऱ्या लग्नसराईसाठी ग्राहक याच कालावधीत सोने खरेदी करत असतात त्यांच्यासाठी हा चांगला योग आहे. पुढील कालावधीत आणखी भाववाढ होण्याची शक्यता आहे.
गिरीश नवसे अध्यक्ष, दि नाशिक सराफ असोसएशन
सोने खरेदीकडे गुंतवणुकदारांचा कल: चेतन राजापुरकर
जागतिक तज्ज्ञांनी वाढीची शक्यता व्यक्त केली असून पुढील दरवाढ लक्षात घेऊन गुंतवणूकदारांचा खरेदीकडे कल दिसून येत आहे. निर्बंध शिथिल झाल्याने पुढील येणाऱ्या सण, उत्सव आणि लग्नसराईसाठी ग्राहकांना मुक्तपणे खरेदीचा आनंद घेता येणार आहे.
चेतन राजापुरकर
संचालक, महाराष्ट्र स्टेट बोर्ड (आयबीजे)