दिंडोरी| बालवयातच बालकांना सुसंस्कारीत केले व त्यासाठी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून बालपणापासून शाळेत येण्याची गोडी निर्माण केल्यास उद्याची सुसंस्कारीत पिढी त्यातून निर्माण होईल, तसेच प्रत्येक गावात डिजिटल अंगणवाडी होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मा. आ. रामदास चारोस्कर यांनी काल येथे केले.
नाशिक पंचवटी येथील श्री गजानन महाराज पतसंस्था विद्यमाने संस्थेच्या २९ व्या वर्धापनदिनानिमित्त सामाजिक उपक्रम निधीतून केलेल्या डिजिटल अंगणवाडी उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, बालकाचा बौद्धिक पाया ज्या वयापासून सुरु होतो त्याच वयात त्यांच्या सर्वागीण बौद्धिक व शैक्षणिक विकास होण्यासाठी बालवयातच अशा अंगणवाडीची नितांत गरज असते.अशा या शैक्षणिक कार्याची सुरुवात श्री गजानन महाराज पतसंस्थेने केली हे भूषणावह आहे.
याप्रसंगी डिजिटल अंगणवाडीचे उद्घाटक नाशिक जिल्हा सहकारी पतसंस्थचे अध्यक्ष श्री नारायण शेठ वाजे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या संचालिका डॉ. सौ अंजलीताई पाटील, उपाध्यक्ष के के चव्हाण, नाशिक जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या जनसंपर्क संचालिका अश्विनीताई बोरस्ते, दि विजय अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी नाशिकचे चेअरमन राकेश चव्हाण, नाशिक जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे सीईओ श्री सोपानराव थोरात, जऊळके दिंडोरीचे वृक्षमित्र व सरपंच तुकाराम जोंधळे, अक्राळे जय योगेश्वर ग्रा. बिगर शेती पतसंस्थेचे चेअरमन जी एम गायकवाड, सह्याद्री फॉर्मचे संचालक विलास शिंदे, कादवा सहकारी साखर कारखान्याचे नंदूदादा सोमवंशी, मा पंचायत समिती सदस्य श्री शामराव बोडके, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस श्री भास्करराव भगरे सर, शिवसेना तालुका प्रमुख दिंडोरी श्री. पांडूरंग गणोरे, दिंडोरी गटविकास अधिकारी डॉ श्री निलेश पाटील, सरपंच सौ अर्चना डगळे, उपसरपंच संदीप केंदळे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी उद्घाटक श्री नारायण वाजे यांनी श्री गजानन पतसंस्थेने बालकांसाठी केलेल्या अंगणवाडी सुविधांचे कौतुक केले. अशाच प्रकारचे उपक्रम इतरही पतसंस्थामार्फत नाशिक जिल्ह्यात सुद्धा राबविण्याचे सूतोवाच त्यांनी केले. या प्रसंगी केलेल्या भाषणात अनेक वक्त्यांनी संस्थने जो आदर्श निर्माण केलेला आहे याचे मनापासून कौतुक करून श्री गजानन महाराज पतसंस्था, अक्राळे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ यांचे अभिनंदन केले. डॉ सौ अश्विनी ताई बोरस्ते, डॉ सौ अंजली पाटील, डॉ निलेश पाटील, नंदू सोमवंशी, श्री पांडुरंग गणोरे, श्री संदीप केंदळे आदींनी केलेल्या मनोगतात संस्थेचे अभिनंदन केले. अंगणवाडीच्या वर्गात शिशु बालकांना सहज समजतील अशी चित्ररूपाने बाराखडी, व प्राण्यांची चित्रे रंगविण्यात आली होती. प्रांगणात झोके, खेळणी व लौन्स याची उभारणी करून परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तसेच गावातील सर्व झाडे पांढरे व गेरू रंगाने उजळविण्यात आले होते.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री बापूसाहेब गायकवाड यांनी संस्था सामाजिक उपक्रम निधीमधून करित असलेल्या विद्यार्थी दत्तक योजना, मयत सभासदांच्या वारसांना आर्थिक मदत, श्री गजानन साक्षी सोने खरेदी योजना यांची माहिती देऊन संस्था करीत असलेल्या गृहनिर्माण, वाहन, हफ्तेबंद, अल्पबचत, मुदत ठेवी, सोने तारण ईत्यादी कर्जांबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच यापूर्वीही मोहाडी व अक्राळे येथील शाळांना शालेय शैक्षणिक साहित्य पुरविल्याचे त्यांनी विषद केले.
भविष्य काळात विविध शैक्षणिक कार्यात सदैव मदतीचा हात तुमच्या पाठीशी राहील असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रविंद्र गायकवाड संचालक व आभार प्रदर्शन व्यवस्थापिका सौ मृणाली कर्णिक यांनी केले. सोहळयाचे खुमासदार संचलन श्री सुभाष मामा बिडवई, अंतर्गत लेखापरीक्षक यांनी केले.
कार्यक्रमास राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व इतर क्षेत्रातील मान्यवर तसेच पतसंस्था फेडरेशनचे पदाधिकारी, श्री गजानन महाराज पतसंस्थाचे सर्व संचालक व कर्मचारी, पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, व रहिवासी आणि अक्राळे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन श्री बापूसाहेब गायकवाड, श्री आत्माराम मुरकुटे, श्री रविंद्र गायकवाड, सौ मृणाली कर्णिक व कर्मचारी, सौ करुणा पांडव अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस, श्री संदीप केंदळे, श्री अनिल गायकवाड व इतरांनी परिश्रमपूर्वक केले.




