नाशिक|शारजाह एक उदयोन्मुख व्यापार केंद्र असून, उत्कृष्ट जमीन, सागरी आणि हवाई संपर्कांद्वारे अद्वितीय लॉजिस्टिक फायदे देते. नाशिकमधील व्यापारी समुदायाने सैफ (SAIF) झोनमध्ये आपला व्यवसाय सुरु करून युएई सरकार देत असलेल्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सैफ झोनचे अधिकारी पी राजीव यांनी केलं
भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यात नुकत्याच स्वाक्षरी झालेल्या 'व्यापक आर्थिक भागीदारी करारांतर्गत, भारतातून 'युएई'मध्ये निर्यात केल्या जाणाऱ्या बहुतांश वस्तूंवरील आयात शुल्क कमी केले किंवा कमी करण्याचे मान्य करण्यात आले आहे. या अनुषंगाने, द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (ASSOCHAM) आणि शारजाह सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर (MACCIA) च्या पाठिंब्याने; अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (AIMA) आणि स्त्री उद्यमी फाउंडेशनने नाशिकमध्ये भारतीय उद्योगांसाठी युएई मधील विविध व्यवसाय संधी आणि SAIF झोनमध्ये व्यवसाय सुरू करण्याच्या फायद्यांविषयी जागरुकता करण्यासाठी परिषदेचे आयोजन केले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते.
सैफ झोनमधील जवळपास 60 टक्के गुंतवणूकदार भारतातील असून, महिला उद्योजकांना आपला व्यवसाय इथे सुरु कर्णयसाठी युएई सरकार तर्फे खास प्रोत्साहन पॅकेज देण्यात येते. युएई मधील मुक्त व्यापार क्षेत्राची संकल्पना स्पष्ट करताना, सैफ झोनचे अनूप वॉरियर यांनी, सैफ झोनमध्ये व्यवसाय संस्था स्थापन करणे, भारतीय कंपन्यांसाठी अत्यंत आकर्षक असू शकते यावर प्रकाश टाकला. नाशिक आधारित उद्योग युएई , विशेषतः शारजाह सैफ झोनचा आफ्रिका आणि युरोपसाठी पुनर्निर्यात आधार म्हणून फायदा घेऊ शकतात. 2.5 लाख भारतीय रुपयांपेक्षा कमी खर्चात, कोणतीही कंपनी सैफ झोनमध्ये कार्यालय उघडू शकते, ज्यामध्ये एक वर्षाचे भाडे, वीज, पाणी, सर्व परवानग्या आणि 3 निवासी व्हिसा यांचा समावेश आहे.
यावेळी आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, एमएसएमईचे अध्यक्ष आशिष नहार, स्त्री उद्यमी फाउंडेशनच्या उपाध्यक्षा स्वाती शहा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. बी२बी मध्ये नाशिकमधील सुमारे १२५ उद्योजकांनी चर्चा केली असून, यापैकी अनेक जणांनी सैफ झोन मध्ये व्यवसाय सुरु करण्यास अनुकूलता दाखवली आहे.
