नाशिक| जागतिक बालक शोषण विरोध दिनानिमित्त जनजागृती करण्यासाठी औरंगाबाद ते आरोग्य विद्यापीठ दरम्यान महात्मा गांधी मिशन इन्स्टिटयुट ऑफ फिजीओथेरपी महाविद्यालयाच्या सत्तर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या रॅलीचा समारोप आरोग्य महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात करण्यात आला. दि. 17 नोव्हेंबर पासून औरंगाबाद येथून या रॅलीचा प्रारंभ करण्यात आला होता. या रॅलीचा प्रमुख उद्देश हा बाललैंगिक शोषणाच्या विरोधात जनजागृती व प्रबोधन करण्याचा होता. या 210 किलोमीटरच्या रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी पथनाटयाव्दारे संदेश देण्याचे कार्य केले.
याप्रसंगी विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प. यांनी दृकश्राव्य संदेशाव्दारे सांगितले की, सक्षम आणि संवेदनाशील पिढी घडविण्यासाठी बाल अवस्थेत मुलांना सुयोग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या प्रवेशव्दारापासून ते विद्यापीठ परिसरापर्यंत विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या रॅलीत सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मोरे, उपकुलसचिव डॉ. सुनिल फुगारे, डॉ. संजय नेरकर, डॉ. स्वप्नील तोरणे, इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा श्रीमती धारा मालुंजकर, महात्मा गांधी मिशनचे सचिव श्रीमती प्रेरणा दळवी, प्राचार्य डॉ. शरद बाबू आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. या उपक्रमासाठी श्री. बाळासाहेब पेंढारकर, श्री. राजेश इस्ते, श्री. आबाजी शिंदे यांनी परिश्रम घेतले.

