नाशिकरोड| प्रतिनिधी| पाथर्डी- वडनेर दुमाला रोडवरील फर्निचर, प्लास्टिक, लाकडी वस्तू व भंगारच्या गोदामाला आज पहाटे तीनच्या सुमारास अचानक आग लागली. त्यात सुमारे चार लाखांचे नुकसान झाले. नाशिक शहरातील विविध ठिकाणच्या अग्नीशमन दलांच्या आठ बंबांनी तीन तासाच्या अथक प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली.
अग्नीशमन दलाच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पाथर्डी-वडनेर दुमाला रोडवर मंजुर मुस्तकीन खान यांचे फर्निचर, प्लास्टिक, भंगाराचे गुदाम आहे. आज पहाटे तीनच्या सुमारास गोदामातून धूर व आगीच्या ज्वाळा येते असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. मुस्तकीन खान व नागरिकांनी त्वरित अग्नीशमन दलाशी संपर्क साधला. नाशिकरोडच्या तीन बंबांनी पाण्याचा मारा सुरु केला. मात्र, आग आटोक्यात येत नसल्याने सिडको, पंचवटी, सातपूर, शिंगाडा तलाव, के. के. वाघ, अंबड एमआयडीसी येथील अग्नीशमन केंद्राच्या आठ बंबांनी तीन तासात आग आटोक्यात आणली. आगीचे कारण समजू शकलेले नाही. आगीत सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. मात्र, चार लाखाचे नुकसान झाले आहे.
उपनगर व इंदिरानगर पोलिस ठाण्याचे अधिकारी व पोलिस घटनास्थळी दाखल झाले.येथे अनधिकृत भंगार व्यवसायिकांनी कित्येक दिवसांपासून बस्तान मांडले असून भंगार मार्केट हटवावे, अशी परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे.