नाशिकरोड|प्रतिनिधी|मोठी दुरवस्था झालेल्या जेलरोड-टाकळी रोडची अखेर महापालिकेच्या आयुक्तांनी दखल घेतल्याने खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे महानगर सचिव राजेश आढाव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने या प्रश्नी आयुक्तांची भेट घेऊन रस्ता डांबरीकरणाची मागणी केली होती. त्यानंतर आयुक्तांनी अधिका-यांना पाठवून रस्त्याची पाहणी केली आणि त्वरित कामाला सुरुवात केली.
सततच्या पावसाने गेल्या काही महिन्यांपासून हा महत्वाचा रस्ता खराब झाला होता. ठिकठिकाणी खड्डे पडले होते. दुचाकी, चारचाकी चालकांना समस्यांला तोंड द्यावे लागत होते. त्यांना मणके, पाठीचे त्रास सुरु झाले होते. गाडीचे नुकसान होत होते. नाशिकहून जेलरोडला पोहचण्यासाठी उपनगर आणि नांदुरनाका हे दोन पर्यायी मार्ग आहेत. मात्र, त्या मार्गाने जादा वेळ, पैसा खर्ची पडत असल्याने नागरीक जेलरोड-टाकळी रोडचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहेत. विद्यार्थी, नागरिक, शासकीय व खासगी कर्मचारी या रस्त्याचा वापर जास्त करतात. हा रस्ता अरुंद आहे. त्यातच पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. चारचाकी तर सोडाच परंतु, दुचाकी चालवणेही अवघड झाले होते. लोकप्रतिनिधींनी या महत्वाच्या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत होती. भाजपच्या शिष्टमंडळाने तक्रार केल्यानंतर आता रस्ता काम सुरु झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
