मुंबई|रेल्वेतील खानपान सेवेबाबत आलेल्या तक्रारी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने राजधानी गाड्यांसह इतर रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या अन्नाचा दर्जा सुधारण्यासाठी नव्या उपाय योजना हाती घेतल्या आहे. प्रवाश्यांना अधिक दर्जेदार खानपान देण्यासाठी उपाय योजना केल्या जाणार आहे, अशी माहिती रेल्वे, दूरसंवाद आणि इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
1) बेस किचन/स्वयंपाकगृह युनिट्सचे आधुनिकीकरण हाती घेतले.बेस किचन/स्वयंपाक गृहामध्ये स्वयंपाक तयार करत असताना प्रत्यक्ष देखरेख करण्याच्या दृष्टीने सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
2) राजधानी गाड्यांमध्ये भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ लिमिटेड (आय.आर.सी.टी.सी) पर्यवेक्षकांची नियुक्ती. खाद्यपदार्थांच्या पॅकेट्सवर QR कोड लावले आहेत ज्यावर किचनचे नाव, पॅकेजिंगची तारीख, कालबाह्यता तारीख, वजन इत्यादी तपशील दिले आहेत.
3) पॅन्ट्री कार आणि किचन युनिटमधील स्वच्छता आणि आरोग्यपूर्ण स्थिती तपासण्यासाठी तृतीय पक्ष लेखापरीक्षण केले जाते. ग्राहक समाधान सर्वेक्षण देखील केले जाते.भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफ.एस.एस.ए.आय)च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होते आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी, प्रत्येक खानपान युनिटसाठी नियुक्त केलेल्या अन्न सुरक्षा अधिका-यांकडून प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.
4) अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या पद्धतींवर लक्ष ठेवण्यासाठी किचन युनिट्समध्ये अन्न सुरक्षा पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा अधिकार्यांसह रेल्वे/आयआरसीटीसी अधिकार्यांकडून नियमित आणि आकस्मिक तपासणी केली जाते.या उपाय योजनांव्यतिरिक्त, प्रवाशांचा अभिप्राय आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी Rail Madad, Twitter handle @ IR CATERING, CPGRAMS, ई-मेल आणि एसएमएस यांची एक प्रणाली विकसित केली आहे.
5) रेल्वे गाड्यांमध्ये पुरवल्या जाणार्या जेवणाचा दर्जा योग्य आहे याची खात्री करण्यासाठी तपासणी आणि देखरेखीचा एक भाग म्हणून अन्नाचे नमुने नियमितपणे गोळा केले जात आहेत. गेल्या तीन वर्षांत आणि आजपर्यंत, रेल्वे/आरसीटीसी द्वारे 787 नमुने गोळा केले गेले.
6) गेल्या तीन वर्षांत राजधानी गाड्यांमधील खानपान सेवांबाबत एकूण 6,361 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
