नाशिक| सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्लिश मीडियम या शाळेत पालकांसाठी' कोवळे किरण -संवाद आपुलकीचा' या विषयावर समुपदेशनपर व्याख्यान संपन्न झाले. पालकांचे वर्तन - मुलांचे अनुकरण याविषयी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध होमिओपॅथिक मानसोपचारतज्ञ डॉ. वृषिनीत सौदागर यांनी व्याख्यानातून मुलांच्या मानसिक शारीरिक, शैक्षणिक व सामाजिक, समस्यांवर अतिशय हसत खेळत, सर्वंकष उदाहरणे देऊन सोप्या, पटेल, रुचेल अशा शब्दांमध्ये प्रभावीपणे समुपदेशन केले.
कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने झाला, संस्थेचे पालक नितीनजी गर्गे यांनी प्रास्ताविकामध्ये पालकांशी पाल्याच्या हिताविषयी संवाद साधला. प्रमुख वक्ते डॉ. वृषिनीत सौदागर यांनी चित्रफितीद्वारे 'पालकांचे वर्तन - मुलांचे अनुकरण' या मुद्द्यावर भर दिला. मुलांचे मातीशी नाते जुळू द्या तरच त्यांची प्रतिकारशक्ती वाढेल हे सांगतानाच व्यवहारातील उदाहरणे देऊन मानसिक शक्ती वाढावी म्हणून मुलांना अध्यात्माकडे वळवा , पाल्यांशी सुसंवाद साधा हे स्पष्ट केले . मानसिक आरोग्य सर्वात महत्त्वाचे असून ते नसेल तर मधुमेह, सोरायसिस, लठ्ठपणा इ. आजार उद्भवतात, त्याचमुळे प्रतिकारशक्ती, आयुर्मर्यादा कमी होत चाललेली आहे असे सांगितले. आठवड्यातून एक दिवस पालकांनी देखील मोबाईल शिवाय व्यतीत करावा आणि स्वतःला व मुलांना ह्या आभासी विश्वापासून दूर ठेवून वर्तनातील बदलाचे निरीक्षण करावे असे सांगितले. कार्यक्रमानंतर प्रश्नोत्तर सदरात अनेक पालकांनी प्रश्न विचारले आणि समस्यां चे निराकरण करून घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा घोलप यांनी केले. परिचय सुपरवायझर प्रियांका भट यांनी करून दिला तसेच आभार मनीषा बॅंडकुळे यांनी मानले. मुख्याध्यापिका डॉ.अंजली सक्सेना , उपमुख्याध्यापिका जयसुधा नायडू पर्यवेक्षिका प्रियांका भट यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमासाठी मोठया संख्येने पालकवर्ग उपस्थित होता.
