नाशिक| विद्यार्थ्यांच्या सकारात्मक मानसिक आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी ’मानस’ अॅप उपयुक्त असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प.वि.से.प यांनी केले. आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी विद्याशाखेतील विद्यार्थ्यांकरीता विद्यापीठातर्फे ‘कुलगुरु का कट्टा’ ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प.वि.से.प यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
या कार्यक्रमास मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, आयुर्वेद व युनानी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकांत देशमुख, होमिओपॅथी विद्याशाखेचे डॉ. धनाजी बागल, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यापीठाचे मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, MANAS म्हणजे मेंटल हेल्थ आणि नॉर्मलसी ऑगमेंटेशन सिस्टम या प्रणालीचे विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील लिंकचे उद्घाटन विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी ‘मानस’ चे कार्य प्रभावी आहे. विद्यार्थ्यांनी निरोगी, आनंदी आणि स्वस्थ राहण्यासाठी मानसची भूमिका महत्वपूर्ण आहे. मानसिक आरोग्याची समस्या लक्षात घेऊन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामध्ये करण्यात आलेला आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, अभ्यास करतांना विद्यार्थ्यांनी कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांकरीता विविध उपक्रम राबविण्यात येतात. संशोधन, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात आरोग्य शिक्षणातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा. समस्यांवर उपाय शोधण्यासाठी महत्वाकांक्षी असावे. शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नाते अधिक दृढ होण्यासाठी महाविद्यालय स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. ‘कुलगुरु का कट्टा’ च्या माध्यमातून प्राप्त माहितीव्दारे अनेक बाबी पुढे येतात त्यानुसार विद्यापीठाकडून निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, विद्यापीठाचे विविध उपक्रमांना विद्यार्थ्यांकडून मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. पर्यावरण संवर्धन, उर्जा बचतीचे अनेक उपक्रम सर्वांसाठी हितकारक आहेत. विद्यार्थ्यांनी आरोग्य शिक्षणाबरोबर संशोधन, कौशल्य विकास, वाचन आदी गुणांचा विकास होण्यासाठी प्रयत्नशील रहाणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडून निर्देशित केलेल्या उपक्रमात मोठया प्रमाणात सहभाग घ्यावा. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विद्यापीठाकडून उपक्रम राबविण्यात येतात. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपक्रमांची माहिती प्रसिध्द करण्यात येते. शैक्षणिक व तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्ञान विद्यार्थ्यांनी नेहमीच अद्यायावत ठेवावे असे त्यांनी सांगीतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे विद्यापीठाचे युटयुब चॅनलवरुन प्रसारण करण्यात आले. या ऑनलाईन कार्यक्रमास संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व महाविद्यालय प्रमुख मोठया संख्येने उपस्थित होते.
