नाशिकरोड|प्रतिनिधी|थंडीची चाहूल जाणवल्यास ग्राहकांची पावले सुका मेवा खरेदी कडे वळतात. नाशिक मध्ये गारठा वाढल्याने सुका मेवा टाकून हिवाळ्यातील खास पदार्थ व सर्वांचे आवडते असे "डिंकाचे लाडू" तयार करण्यात घरोघरी महिलावर्ग प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिकरोड, उपनगर, गांधीनगर बाजारात किराणा दुकानांमध्ये सुका मेवा खरेदी साठी ग्राहकांची विशेषतः महिलांची गर्दी होत आहे. तरुणवर्ग शरीर कमावण्यासाठी, ज्येष्ठ नागरिक तंदुरुस्तीसाठी तसेच लहान मुलांना पौष्टिक आहार हिवाळ्यात प्राप्त व्हावा, यासाठी सर्वच वयोगटातील लोकांची मागणी सुका मेव्याला असते. बदाम, काजू, खारीक, सुरी खारीक, खोबरे, डिंक, गूळ, साखर, अंजीर, जरदाळू, अक्रोड, तूप, बिब आणि चाराची गोडांबी व ईतर पौष्टिक सुका मेव्याची मागणी वाढल्याचे स्थानिक विक्रेते सांगतात.
यंदा पर्जन्यमान चांगले झाल्याने थंडी जाणवेल, असा अंदाज हवामान तज्ञांतर्फे बांधण्यात आला होता. तो खरा ठरून साधारण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्या पासून नाशिक मध्ये गारठा वाढायला सुरुवात झाली. पहाटे आणि सायंकाळी सहा नंतर थंडीचा कडाका जाणवतो. बहुतेक जण यादिवसात सकस आहाराला प्राध्यान्य देतात. सर्वच वयोगटातील नागरिकांना सकस आहाराचा सल्ला डॉक्टरही देतात. घरातील ज्येष्ठ मंडळी, लहान मुलांच्या आरोग्याप्रती काळजी घेऊन घरातील महिलावर्ग डिंक लाडू तयार करण्यास आग्रही आहेत. सुका मेव्याच्या दर्जा प्रमाणे वेगवेगळे दर आहेत.
खारीक २०० ते ३५० रु, सुरी खारीक ४५० ते ५००, काजू ७५० ते ९००, बदाम ७०० रु पुढे, डिंक १६० ते २००, गूळ ६० रु, साखर ३८ रु, खोबरे ६० रु पुढे, प्रती किलो असे सर्वसाधारण दर दिसून येतात. सुका मेवा व ईतर हिवाळ्यातील पौष्टिक पदार्थ घेण्यासाठी नागरिकांची गर्दी अजून वाढेल, असा अंदाज स्थानिक दुकानदार व्यक्त करतात.
हिवाळ्यात सुकामेव्याला वाढती मागणी
हिवाळ्यात सुका मेवा व ईतर पौष्टिक पदार्थांना मागणी वाढते, हे लक्षात घेऊन तसे नियोजन करण्यात आले होते. सुका मेव्याचे भाव तसे स्थिर राहतील, पण खारीक, सुरी खारीक यांचे भाव पुढे वाढण्याचा अंदाज आहे.
बाळासाहेब दंदणे,
भारत प्रोव्हिजन, गांधीनगर.
---------------------------