नाशिकरोड|प्रतिनिधीना|नाशिकरोड ते व्दारका रस्त्यावरील प्राचीन वृक्ष हटविण्याचे काम सुरु झाले आहे. दत्तमंदिर, उपनगर नाका, गांधीनगर येथे वाहतुकीला अडथळा ठरणारी २४ झाडे तोडण्यास महापालिकेने राष्ट्रीय महामार्ग विभागाला परवानगी दिली आहे. त्यामुळे वाहतूक वेगाने व सुरक्षित होईल, असा प्रशासनाचा दावा आहे. वाहतूक कोंडी व अपघात टळणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, नंतर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी, तोडण्यात येणा-या जुन्या वृक्षांच्या बदल्यात देशी झाडे लाऊन ती वाढवावीत, अशी मागणी होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकऱ्यांनी सांगितले की, व्दारका ते नाशिकरोड या साडेसहा किलोमीटर मार्गाचे रुंदीकरण नव्हे तर मजबूतीकरण होणार आहे. अकरा महिन्यांची मुदत या कामासाठी असली तरी १५ मे पर्यंत काम पूर्ण केले जाणार आहे. एकूण खर्च १९.४२ कोटी खर्च येणार आहे. यामध्ये रस्ता मजबूतीकरण, डांबरीकरण, गतीरोधक टाकणे, झेब्रा क्रॉसिंग, दुभाजकांना रंगरंगोटी व ग्रील दुरुस्ती, धोकादायक झाडांना रेडियम लावणे आदींचा समावेश आहे.
या मार्गावरील २४ झांडापैकी १५ तोडली जाणार असून नऊ झाडांचे पुनर्रोपण होणार आहे. अतिक्रमणे ओळखण्यासाठी रस्ता कडेला पांढरे पट्टे मारण्यात येणार आहे. देवळालीगाव, जयभवानी रोड, उपनगर, गांधीनगर, विजय ममता चौक, जेलरोड-टाकळी, टाकळी-काठेगल्ली मार्गे नाशिकला जाता येते. हे सर्व उपरस्ते नाशिकरोडला कोठे ना कोठे मिळतात. नाशिकरोड व उपनगरातील हजारो नागरीक, कामगार, विद्यार्थी, व्यावसायिक या मार्गाने नाशिकला ये जा करतात. सकाळी व सायंकाळी हा महामार्ग जॅम होतो. त्यामुळे रस्त्यावरील अडथळे दूर करणे काळाची गरज झाली आहे.
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील जुनी झाडे रस्ता रुंदीकरणासाठी तोडल्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. आता तेथे वाहने व व्यावसायिकांची अतिक्रमणे झाली आहेत. व्दारका ते नाशिकरोड दरम्यान झाडे तोडून रूंद केला तरी ठिकठिकाणची अतिक्रमणे हटविण्याची हमी पोलिस, महापालिका, महामार्ग प्राधिकरणाने द्यावी, एकमेकांकडे बोट न दाखवता कारवाई करावी. व्दारका चौकात रिक्षा, टेम्पो, एसटी व खासगी बस उभ्या राहतात. पुढे दुतर्फा व्यावसायिकांचे ठेले आहेत. काठे गल्ली सिग्नल परिसरातही हीच समस्या आहे. विजय ममता सिग्नलच्या पुढे दुतर्फा वाहने उभी केली जातात. उपनगर नाका सिग्नल येथेही अतिक्रमणे रस्त्यावर खड्डे आहेत. तेथून पुढे दत्त मंदिर चौक, बिटको चौकापर्यंत दुतर्फा दुचाकी, छोटी मोठी वाहने, व्यावसायिक यांची मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे आहेत.
सिन्नर फाटा-पुणे रस्ता रुंदीकरणाची कार्यवाही पूर्ण झाल्याने वाहतूक वेगवान व सुरक्षित झाली आहे. वेळ व इंधनाची बचत होत आहे. अपघात मालिकांवर नियंत्रण आले आहे. मात्र, नाशिक रोड ते व्दारका दरम्यान काही झाडे, अतिक्रमणे यांचा अडथळा असल्याने वाहतूक कोंडी, प्रदूषणात वाढ होते. इंधन व वेळेचा मोठा अपव्यय होतो. नाशिकरोड-व्दारका दरम्यान अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत. रस्ता मजबूतीकरणाची मागणी लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग विभागाने आता पाऊले टाकली आहेच. शंभर वर्षे जुनी कडुनिंब, वड, चिंच अशी झाडे तोडण्यास सुरूवात झाली आहे.
नाशिकरोड-व्दारका मार्गावरील झाडे तोडून प्रशासनाने रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे मोठा वेळ वाचणार असून वाहतूक कोंडी, प्रदूषण टळणार आहे. हे काम झाल्यावर अतिक्रमणे होणार नाही याची दक्षता घ्यावी.
डॉ. विजय गायकवाड
रस्ता दुतर्फा दर दहा मीटरवर झाडे लावण्याचा कायदा आहे. तोडल्या जाणा-या एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावणे, प्रत्येक रस्त्यावर जास्तीत जास्त झाडे लावणे सक्तीचे आहे. त्याचे पालन करावे. रस्त्याकडेची झाडे तोडू नयेत.
अश्विनी भट, पर्यावरण कार्यकर्ते
- Get link
- X
- Other Apps
Labels
शहर- Get link
- X
- Other Apps
